Saturday, April 28, 2012

कंबोडियातील शिल्पवैभव India in Cambodia


कंबोडियातील शिल्पवैभव

altपुष्पा जोशी
altकंबोडियाच्या सियाम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून बसने हॉटेलवर आलो. येथून जवळच असलेल्या अंगकोर येथे ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू देवालयांचा शिल्पसमूह तब्बल ७७ चौरस कि. मी. एवढय़ा प्रचंड परिसरात पसरलेला आहे. सॅण्डस्टोन, विटा व लाल-पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते. येथील अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैली तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो. प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदते आहे. आजही येथे ९० टक्के लोक खमेर वंशाचेच आहेत. त्यांची लिपी आणि भाषाही खमेर आहे. अंगकोर ही कंबोडियाची राजधानी होती. सोळाव्या शतकात साहसी युरोपियन प्रवाशांना येथील घनदाट जंगलात भ्रमंती करताना या मंदिरशिल्पांचा अकस्मात शोध लागला. अंगकोर वाट (वाट म्हणजे मंदिर) हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय राजा सूर्यवर्मन (द्वितीय) याच्या कारकीर्दीमध्ये १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे (गोपुरे) मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे. मंदिराभोवतालचे तळे हे क्षीरसागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. जगातील सर्वात मोठी श्री विष्णूंची आठ हात असलेली भव्य मूर्ती येथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते; परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे. खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्माचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियममध्ये आहे.
या मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या लांबलचक ओवऱ्या, त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध आहेत. सलग ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या पॅनेलवर रामायण व महाभारत यांतील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडवांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म, बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य, भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरले आहेत. पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गायी, आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण, पार्वतीच्या विनंतीवरून शंकराला बाण मारणारा कामदेव, त्याच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन करणारे देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे, आकाशातील सूर्य-चंद्र, कुर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, प्रजाजन, हत्ती, घोडे, रथ व बासरी, ढोलकी, गाँग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्यापुढील पॅनलवर हिंदू पुराणांतील स्वर्ग, नरक, देवदेवता, रेडय़ावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ १८०० अप्सरांची पूर्णाकृती शिल्पे आहेत.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोटय़ा मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत, तिथे मागील दोन हातांत कमल व चक्र आहे.
वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॉरिडॉर्स नि उंच जिन्यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूंच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्याकरता पाच मजली उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे सुरेख वळणावळणांचे आहेत. 
अंगकोर थोम (शहर) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव, तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरून समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना चार तोंडे असलेली भव्य मूर्ती आहे. पायथ्याशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला सोंडेने कमळे तोडणारा इंद्राचा ऐरावत आहे. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाल्या आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आज जंगलांनी व्यापला आहे. 
आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. त्यापैकी फक्त दक्षिणेकडील भाग आज सुस्थितीत आहे. प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य बेयॉन देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोऱ्यावर राजाशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या इमारती बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता कोरल्या आहेत. एक आरोग्यशाळा (हॉस्पिटल) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहऱ्याभोवती नागाचा फणा असलेली १२ फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. उंच चौथऱ्याच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबडय़ांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी शिल्पे आहेत. एका चौथऱ्याखाली हत्तींची रांग, तर एके ठिकाणी मनुष्यधडाला एकदा गरुडाचे व एकदा सिंहाचे तोंड असलेली अनेक शिल्पे आहेत. पोलोसारखा खेळ खेळताना ते दाखविले आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता, जलचर आहेत. नाक तुटलेला, हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरलेला आहे. त्याला 'लेपर किंग' असे म्हणतात. जयवर्मन सातवा व जयवर्मन आठवा यांच्या कारकीर्दीत हे शहर उभारले गेले आहे.
दा फ्राम येथील शिल्पकाम जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या-तेराव्या शतकात झाले. येथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह व ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमिदेवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सगळे शिल्पकाम गाइडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण प्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीत हे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील भेगा रुंद करून आपली पाळेमुळे त्यात घुसवून शिल्पांवर कब्जा केला आहे.
बान्ते सरायचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅण्डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तीभोवतीच्या महिरपीवरील नक्षी, कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीताहरण, सुंद-उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र आणि त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर, हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले छोटे असे हे मंदिर म्हणजे खमेर कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे (लिंटल) असे सारे सुंदर उठावदार नक्षीकाम आणि शिल्पकामाने इंच न् इंच भरलेले आहे.
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण व पुनर्बाधणी करण्यासाठी जपान, चीन, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरांत पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. परंतु येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत, तसेच पॉल पॉटच्या कारकीर्दीत त्यांचा विद्ध्वंसही करण्यात आला आहे. अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेल्या दहा वर्षांत आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सोयी-सुधारणाही करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी असलेल्या कंबोडियाला आपले पूर्ववैभव लवकरच प्राप्त करता येईल अशी आशा करूया.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive